Description
आपण कधीतरी अडगळीत टाकलेल्या वस्तू आणि तत्सम गोष्टी शोधतो, आणि हळूहळू त्या सापडतात सुद्धा… आपोआप त्या वस्तूसोबत मग हलकेच, आतला मनातला एक एक बंद कप्पा उलगडायला लागतो… तेव्हा जाणवतं अर्रेच्या या मनाच्या आतल्या कप्प्यात अशा बऱ्याच अडगळीच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्थळ, काळ आणि वय विसरायला लावतात..!
विसरता विसरता आठवू लागतात सारे अनुभवलेले, भोगलेले क्षण… सुखाचे तर कधी दु:खाचे, जे प्रत्येकाच्या वाटयाला आलेले असतात, काहीतरी सुचवून, शिकवून गेलेले असतात, जसं एकाद्या फुलपाखराने हाताला स्पर्श करून जावं, अन् जाताजाता आपल्या अस्तित्वाचा वर्ख सोडून जावा..! माहित असत की हा वर्ख कायमस्वरूपी राहणारा नाही, अगदी तसंच सुख दुखःचं नातं मनाशी. मनात कुठेतरी आत खोलवर, हुरहूर राहते अशा घटनांची, कधी धुमसत राहतो लाव्हा, तेव्हा कुणी मुक राहतो, कुणी व्यक्त होतो शब्दातून… माझं पण असंच झालं, इयत्ता दहावी अनुकरण करण्याच्या वयापासून सुरवात झाली “ट ला ट, आणि र ला र” लिहून झालं, नंतर काही काळ सर्व ठप्प… महाराष्ट्र कॉलेजमध्ये श्री उमाकांत कीर सर व नंतर रुपारेल कॉलेजला असताना माजी खासदार कै. श्री राम कापसे सर मराठी विषय घेत, त्यांच्या सिद्धहस्त शिकवणी मुळे पुन्हा कवितेची गोडी लागली, कवितेचे प्रकार त्यातील बारकावे, सौंदर्यस्थळे, टीका वगैरे गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या, त्यानंतर माझ्या कविता लिखाणाची सुरवात पुन्हा झाली, कारण माझ्या बाबतीत… ती अवस्था म्हणजे…
“वारसा कुठला ना साहित्य परंपरा,
शब्द म्हणाले या आमचा हात धरा”
अशी झालेली, जे जे मिळत गेलं, ते ते वाचत गेलो, आणि आज इथवर. यातही काहिंच्या मते मला कविता कळत नाही, समजत नाही, आणि लिहिता येत नाही…असो, तरी सुद्धा मी मात्र…
“कधी मात्रात लिहितो, कधी छंदात लिहितो,
बऱ्याचदा खुप काही, फक्त नादात लिहितो”
मग असाच पटेल, रुचेल आणि जमेल तसं लिहितो. आणि मला यात काही वावगं वाटत नाही.
गत अनेक वर्षाचं स्वप्न असलेला माझा पहिलावहिला कविता संग्रह “काही कविता मनातल्या” आज रसिकांना सादर करतांना मला स्वप्नपूर्तीचा विशेष आंनद होत आहे.
या संग्रहातील कविता सोशिकतेने वाचून व वेळोवेळी उचित योग्य मार्गदर्शन करून आपले बहुमुल्य प्रस्ताविक लिहून देणारे औरंगाबाद येथील जेष्ठ कवी, साहित्तिक श्री. उध्दव भयवाळ यांचा मी कायम ऋणी आहे.
ज्यांनी या संग्रहाचे प्रकाशन कार्य इतक्या अल्पकाळात यशस्वी व सुबकपणे पुर्ण केले त्यासाठी मी
“ साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन्स” चे श्री. सुनिल खंडेलवाल यांना संग्रहाचे प्रकाशक म्हणून धन्यवाद देतो.
माझी पत्नी सौ. रोहिणी, मुले शंतनू, रोहन व सुश्ना सौ. सायली व सौ. उर्जा यांचे पाठबळ तसेच माझे असंख्य मित्र, आप्त्तेष्ट, हितचिंतक, आणि टीकाकार यांच्या सहकार्याविना इथवर पोहचणे शक्य झाले नसते, तसेच संग्रहाला लागणारी सर्व तांत्रिक मदत पुरविणाऱ्या सर्व अज्ञात हाताचे मनापासून आभार.
-शिवाजी उमाजी सांगळे
MomsBlessingsCakes –
nhbxvdbxvhgx